पुणे - कोविड-१९ सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात आहे. तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये यासाठीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण जगभरात तिसऱ्या टप्यातच अधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनाची लस किंवा औषध तयार होऊन वापरात येण्यास दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो. याेग्य काळजी घेतल्यास हा आजार बरा हाेत असल्याचे आपल्याकडे दिसून आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी ‘जनता कर्फ्यू’च्या पूर्वसंध्येला दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातील सर्वेक्षण कार्यालय महिनाभरापासून अथक परिश्रम घेत आहे. कोरोनाशी संबंधित राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याची माहिती या ठिकाणी संकलित केली जाते. कोणत्या गावात, शहरात, जिल्ह्यातील रुग्ण, संशयित रुग्ण, क्वाॅरंटाइन लोकांची संख्या आदी बारीकसारीक तपशील संकलित करून तो मुख्यमंत्री कार्यालय तसेच मंत्रालयाकडे पाठवला जातो. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून सर्वेक्षण कार्यालयातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. या सर्व कामाच्या व्यग्रतेतून वेळ काढून डॉ.आवटे यांनी ‘दिव्य मराठी’शी बातचीत केली. त्याचा हा गोषवारा.
> प्रश्न - काेराेनाचा उगम नेमका कसा झाला आणि प्रसार कशा प्रकारे झाला?
आवटे - काेराेना हा एक विषाणूंचा समूह असून ताे फार पूर्वीच शास्त्रज्ञांच्या लक्षात आला आहे. परंतु वेगवेगळ्या स्वरूपात ताे प्राणिजन्यद्वारे मनुष्यात आल्याचे जगात आतापर्यंत दिसून आले आहे. सन २००२ मध्ये मांजरीच्या माध्यमातून सार्स या स्वरूपात ताे समाेर आला. त्यानंतर २०१२ मध्ये उंटाद्वारे मार्स नावाने ताे वेगळ्या स्वरूपात आला. त्याच वेळी स्वाइन फ्लू हा डुक्कर या प्राण्याच्या माध्यमातून आल्याचे निष्पन्न झाले हाेते. काेराेना विषाणूचा उगम हा वटवाघळाद्वारे झाल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमधील वुहान प्रांतात न्यूमाेनियाचे काही रुग्ण सुरुवातीला आढळून आले. शास्त्रज्ञांनी त्यांची तपासणी केली असता नाेव्हेल काेराेना, काेव्हिड-१९ हा विषाणू नवीन स्वरूपात आल्याचे स्पष्ट झाले.
> प्रश्न - मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे सर्वसामान्यांनी गरजेचे आहे का? काेणती दक्षता घेणे आवश्यक आहे?
आवटे - मास्क प्रामुख्याने काेराेना रुग्ण, संशयित रुग्ण, संपर्कात आलेल्या व्यक्ती व उपचार करणारे डाॅक्टर व नर्स यांच्याकरिता गरजेचा आहे. साधा दरराेज वापरला जाणारा रुमाल ताेंडाला बांधला तरी नागरिकांनी चालू शकणारे आहे. महागडे सॅनिटायझर नसेल तर साबणाने वारंवार हात आणि ताेंड धुणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे घरातील टेबल, खुर्ची, टीपॉय, कडी, माेबाइल यांचे पृष्ठभाग दिवसातून दाेन वेळा आेल्या कापडाने पुसणे आवश्यक आहे.
> प्रश्न - ‘वर्क फ्राॅम हाेम’ला प्राधान्य व त्याचप्रमाणे अनेक गाेष्टींवर बंधने आणली जातात हे कितपत महत्त्वाचे आहे?
आवटे - गर्दीच्या ठिकाणी साथीचा राेग पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गर्दी टाळणे आणि दाेन व्यक्तीत ठरावीक अंतर राखणे काेराेनाच्या दृष्टीने गरजेचे आहे. विविध आैद्याेगिक व आयटी कंपन्या तसेच इतर खासगी कंपन्यांसाेबत शासकीय कर्मचाऱ्यांनाही ‘वर्क फ्राॅम हाेम’ दिले जात आहे. सोशल डिस्टन्स न ठेवल्याने काय होऊ शकते हे इटलीमध्ये पाहिले गेले.
> प्रश्न - तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर आपण आहोत? काेराेनाची लस, आैषध निर्माण झाले आहे का?
आवटे - काेराेना विषाणू संसर्गाचे प्रामुख्याने चार टप्पे असून पहिल्या टप्प्यात राेगाचे संक्रमण घेऊन परदेशातून आलेल्या व्यक्ती असतात. दुसऱ्या टप्प्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींकडून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना राेगाची लागण हाेते. तिसऱ्या टप्प्यात स्थानिक रुग्णाकडून स्थानिक व्यक्तींना माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हाेताे. सध्या भारत दुसऱ्या टप्प्यात असून त्यामुळेच तिसऱ्या टप्प्याचा प्रादुर्भाव राेखण्याकरिता विशेष खबरदारी बाळगली जात आहे.
> प्रश्न - मांसाहाराने राेग पसरताे अशी चर्चा आहे, याबाबत नेमके तथ्य काय आहे?
आवटे - काेराेना विषाणू आणि चिकन, अंडी असा मांसाहार याचा काेणत्याही प्रकारचा संबंध नसून साेशल मीडियावर याबाबत माेठ्या प्रमाणात अफवा पसरवली गेल्याने पाेल्ट्री व्यवसायावर त्याचा अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येते. पूर्णपणे शिजवल्यानंतर मांसाहाराचे सेवन आपल्याकडे केले जात असल्याने काेणताही विषाणू त्यात राहण्याची शक्यता नाही