पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला समस्त पुणेकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. सकाळी सातापासून सायंकाळी उशिरापर्यंत एरवी सतत गजबजलेले पुणे जणू थांबून गेले होते. दिवसभर औषधांची दुकाने वगळता सर्व आस्थापना संपूर्णपणे लॉकडाऊन असल्याने शहरभर शांतता पसरली होती. शहरभरात रोज धावणाऱ्या सुमारे १७०० बसपैकी जेमतेम २० टक्के बस रस्त्यावर होत्या. त्यातूनही फक्त पोलिस, वैद्यकीय व्यावसायिक, परिचारिका, अन्य कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जात होता. सायंकाळी टाळ्या, थाळीनाद करुन कोराेनाशी मुकाबला करणाऱ्या डॉक्टर,कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
‘आमचं ठरलंय’ म्हणत कोल्हापूरकर घरीच
कोल्हापूर : रविवारी कोल्हापुरात जनता कर्फ्यूला चांगलाच प्रतिसाद दिला. ‘आमाला काय होतंय’ असं न म्हणता ‘आमचं ठरलंय’ म्हणत रविवारी पूर्ण शहरात पूर्णपणे शांतता दिसून आली. दरम्यान, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात आतापर्यंत संशयित २०३ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सातारा येथे दिवसभर रस्ते सुनसान होते. सायंकाळी मात्र लोकांनी एकत्र येऊन ढोल-ताशे वाजवल्याने जनता कर्फ्यूच्या उद्देशाला हरताळ फासला गेला.