'आराेग्य विभागातील 50% रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार' : आरोग्य मंत्री राजेश टाेपे

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाचे काम प्रचंड वाढले असता ५० टक्के रिक्त पदांमुळे काही ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत अाहे. पुढील ३ महिन्यांत रिक्त पदे भरण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांतच कोरोनाचे आव्हान समोर उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एनआयव्ही संस्थेला भेट दिल्यानंतर गेस्ट हाऊसवर रात्री ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने टोपे यांची भेट घेतली. त्या वेळी झालेली ही प्रश्नोत्तरे.


आरोग्य विभागात रिक्त पदांची संख्या खूप आहे. कोरोनाचा मुकाबला आपण कसा करणार ?


टाेपे : आरोग्य विभागात सुमारे ५० टक्के पदे रिक्त असणे योग्य नाही. त्यामुळे विशेष तज्ज्ञ डाॅक्टरांची पदे तातडीने भरण्यासाठी पावले उचलण्यात येत अाहेत. अनेक वर्षांपासून सरकारी रुग्णालयांतील डाॅक्टरांना बढती न मिळाल्याचे ही दिसून येत अाहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत अाराेग्य खात्यातील रिक्त पदे भरण्याकरिता प्राधान्याने काम करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांना सरळ मुलाखतीद्वारे पदे भरण्याचा अधिकार देण्यात अाला असून ५० टक्के जागा बढतीतून भरल्या जातील. महापालिकांनी त्यांच्या रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत तसेच ग्रामविकास खात्याने प्राथमिक अाराेग्य केंद्रातील नर्स, तंत्रज्ञ अशा रिक्त जागा भराव्यात याकरिता पाठपुरावा करण्यात येईल.


अाराेग्य विभाग अाणि वैद्यकीय शिक्षण यांच्यात कशा प्रकारे समन्वय ठेवण्यात येत अाहे?


टाेपे : अाराेग्य विभाग अाणि वैद्यकीय शिक्षण यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असून ते समन्वयाने काम करत अाहेत. काेराेना विषाणूचा प्रसार ही राष्ट्रीय अापत्ती असून अशा वेळी वैद्यकीय शिक्षणही गरजेचे अाहे. याप्रसंगी हातात हात घालून दाेघांनी काम करणे महत्त्वपूर्ण असून जनजागृतीचे काम करत असल्याने वैद्यकीय शिक्षणाकडे दुर्लक्ष हाेते असे वाटत नाही.


नुमने तपासणीसाठी खासगी प्रयाेगशाळांना मान्यता द्यावी, अशी मागणी केली जात अाहे. याबाबत काय निर्णय घेण्यात अाला अाहे?


टाेपे : सध्या केवळ सरकारी प्रयाेगशाळेत काेराेना रुग्णाचे नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून अाैषध उपचार सरकारी रुग्णालयातच केले जात अाहे. खासगी रुग्णालयाचे प्रयाेगशाळांना मान्यता दिली जावी. याबाबत केंद्राने अनुकूलता दिली, परंतु काेणता अार्थिक हातभार शासन देणार नाही.


काेराेना रुग्णांना विमा देण्याबाबत काय निर्णय झाला अाहे का ?


टाेपे : सध्या सरकारच्या वतीने ९९७ अाजारांना विमा कवच देण्यात अाले अाहे. राज्यातील ५०० रुग्णालयांत असलेली ही सुविधा १ एप्रिलपासून एक हजार रुग्णालयांपर्यंत वाढवण्यात येईल. त्याचा लाभ अनेकांना हाेऊ शकेल. काेराेना तपासणीबाबतचे प्राथमिक उपचार खर्च शासन करत असून ज्यांना अतिदक्षता विभागाची गरज अाहे त्याचा खर्च सदर विम्यात अंर्तभूत अाहे.


काेराेना राज्यात ३१ मार्चपर्यंत अाटाेक्यात येईल का ?


टाेपे : अाम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत असून कर्म करत जावे फळाची अपेक्षा करू नये, या उक्तीप्रमाणे काम करत अाहे. कोरोना अाटाेक्यात येण्यासाठी उपाययाेजना करत अाहे. ज्या ठिकाणी सर्व गाेष्टी संपतात तिथे ईश्वरावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे अाहे. विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू हाेते.


तुमची दैनंदिनी सध्या कशी अाहे?


टाेपे : दरराेज सकाळी अाराेग्य विभागाच्या घडामाेडींचा अाढावा घेऊन प्रसारमाध्यमांना माहिती देताे. दुपारी हाॅस्पिटल, प्रयाेगशाळांना भेटी देणे अाणि तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करणे, खात्याबाबत काही निर्णय घेणे यावर भर देत अाहे. संध्याकाळी पुन्हा माध्यमांना माहिती देऊन अधिकाऱ्यांशी बाेलतो. शासनाचा अाम्ही चेहरा असल्याने प्रसारमाध्यमातून लाेकांपर्यंत माहिती देणे अावश्यक असल्याने त्या दृष्टीने विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम करत अाहे.